♦️ मनवेलमध्ये रविवारी दादाजींचा श्राद्ध सोहळा
♦️ महाप्रसादासह पालखी मिरवणुकीचे भव्य आयोजन
♦️ महाआरतीनंतर रात्रभर रंगणार भजनाचा कार्यक्रम
♦️ महाराष्ट्र-मध्य प्रदेशातून भाविकांची राहणार उपस्थिती
♦️ गंगाफळची भाजी महाप्रसादाचे खास आकर्षण
♦️ रक्तदानासह भाविकांसाठी विविध सेवा उपक्रम
JALGAON | यावल तालुक्यातील हजारो दादाजी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राद्ध सोहळा रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता आरतीने होईल. सकाळी ८ वाजता सेवा, १० वाजता होम-हवन व सेवा, तर दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता महाआरती आणि त्यानंतर विविध ठिकाणांहून आलेल्या दादाजी भक्तांकडून रात्रभर भजन-गायन होणार आहे.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनवेल ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. गावात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या असून, धुनीवाले दादाजींचे भगवे ध्वज लावल्याने संपूर्ण मनवेल गाव भगवामय झाले आहे.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून दादाजींचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही सोहळ्याला भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतात.
श्री रेवानंद स्वामी यांनी मनवेल येथे सुमारे १८ वर्षे वास्तव्य केले होते. भक्तांच्या श्रद्धेनुसार, सन १९३९ मध्ये भाद्रपद महिन्यातील अविधवा ज्येष्ठ वैद्य नवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील अंबाडा येथे तापी नदीच्या काठावर त्यांनी समाधी घेतली. तेव्हापासून मनवेल येथे त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध सोहळा भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा सुरू आहे.
श्री दादाजी धुनीवाले महाराज आणि श्री हरिहरजी भगवानजी यांची महिमा स्वामी रेवानंदजींनी खानदेशातील भक्तांना सांगितली. त्यांच्या माध्यमातून हजारो भक्त श्री बडे दादाजी आणि श्री छोटे दादाजी यांच्या नामस्मरणाशी जोडले गेले. भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामीजींनी अनेक धार्मिक लीला केल्या असून, त्यांच्या स्वरचित भजनमालेचे जतन आजही भक्तांकडे आहे.
मनवेल येथील महादेव मंदिरासमोर स्वामीजींनी लावलेला लाकडी धर्मध्वज आणि त्यावर फडकणारे भगवे निशाण आजही भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. स्वामीजींच्या आशीर्वादामुळे मनवेल आणि परिसर सुजलाम्-सुफलाम् झाल्याची भक्तांची भावना आहे.
या सोहळ्यात वरण-पोळी आणि गंगाफळची भाजी असा विशेष महाप्रसाद असतो. गंगाफळची भाजी प्रसिद्ध असल्याने अनेक भाविक ती प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात.
साकळी येथे दादा भक्तांसाठी बापू धोबी यांच्याकडून दिवसभर मोफत शिरा वाटप करण्यात येणार आहे. मनवेल येथील विठ्ठल मंदिराजवळ भाविकांसाठी दिवसभर मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली असून, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्यासाठी साकळी, शिरसाड, थोरगव्हाण, पथराडे, शिरागड, पिळोदा खुर्द आणि दगडी आदी गावांतील भाविकांचे सहकार्य लाभत आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी | मनवेल, यावल, जळगाव
