अहिल्यानगर जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटात भंडारदरा आणि निळवंडे धरणातील आवर्तन शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या पाणी नियोजनामुळे रब्बी हंगामाला नवी उभारी मिळाल्याचे चित्र आहे.
भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या आवर्तनाचा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेतीपिकांची परिस्थिती गंभीर बनली होती. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी आवर्तनाचे नियोजन आणि पाणी व्यवस्थापन करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.
भंडारदरा आणि निळवंडे हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे जलस्रोत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे संगमनेर, अकोले, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील शेतीला सिंचनाचा आधार मिळतो. यंदा लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने ग्रामीण भागासह शहरांमध्येही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
खरीप हंगाम वाया गेल्याने रब्बी हंगाम तरी साधता यावा, या अपेक्षेने शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे गहू, हरभरा, कांदा, चारा पिके आणि भाजीपाला उत्पादकांसाठी धरणातून सोडलेले पाणी महत्त्वपूर्ण ठरले.
निळवंडे डाव्या आणि उजव्या कालव्यांमधून पाणी शेतापर्यंत पोहोचल्याने अनेक शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता आले. जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाणीसाठा, सिंचनाची गरज आणि लाभक्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन पाणी वितरणाचे नियोजन केले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते.
जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासह उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी प्रभावी वापर करण्यावर भर दिला आहे. सिंचन प्रकल्पांची कार्यक्षमता वाढविणे, कालव्यांची देखभाल, पाणी वितरण व्यवस्था सुधारणे आणि शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिल्याने पाण्याचा अपव्यय कमी होऊन शेवटच्या गावापर्यंत आवर्तनाचा लाभ पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
या आवर्तनामुळे केवळ पिकांनाच पाणी मिळाले नाही, तर नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागला. अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यांतील बंधारे भरून दिल्याने पाणीपुरवठा योजनांनाही दिलासा मिळाला. चारापिकांसह रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा लाभ झाल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी उन्हाळी हंगामातही लाभक्षेत्रातील गावांना पाणीटंचाई भासू नये, यासाठी जलसंपदा विभागाने आवर्तनाचे नियोजन केले होते.
