संविधान दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज पार्टीच्या वतीने यावल येथे संविधान जनचेतना अभियानांतर्गत भव्य जाहीर जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला प्रदेश आणि विभागीय स्तरावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नवीन तहसील कचेरीसमोर, यावल येथे ही सभा होणार आहे.
भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी बसपाच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बसपाचे प्रदेश महासचिव राजाराम साहेब, मराठवाडा विभाग प्रभारी ॲड. सुनील डोंगरे, प्रदेश कोषाध्यक्ष रामचंद्र जाधव, जळगाव विभाग प्रभारी किरण अल्हाट आणि प्रदेश उपाध्यक्ष राज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संविधानाचे संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
सभेच्या आयोजनासाठी विनीत म्हणून नितीन खरात, संजय इंगळे, रमेश राठोड, राकेश खरात, नितीन अत्रे आणि भालचंद्र भालेराव यांच्यासह यावल तालुका व जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक परिश्रम घेत आहेत.
बसपाच्या नेत्यांच्या माहितीनुसार, संविधानातील मूलभूत हक्क, आरक्षण आणि सामाजिक समतेबाबत समाजात गैरसमज पसरविले जात असल्याने संविधानाची खरी माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे आणि संविधानाच्या संरक्षणासाठी बहुजन समाजाने एकत्र येणे, हा या जनसभेचा उद्देश आहे.
या सभेला यावल तालुक्यासह रावेर, चोपडा, फैजपूर आणि भुसावळ परिसरातील कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टी, यावल तालुक्याच्या वतीने नारायण अडकमोल, शांताराम जाधव, प्रकाश मेघे आणि राहुल बनसोडे यांनी केले आहे.
