गावांच्या नावातील साधर्म्यामुळे निर्माण झालेला प्रशासकीय गोंधळ… आणि त्यामुळे शासकीय लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी! मात्र, भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या एका फोन कॉलनंतर अवघ्या १२ तासांत प्रशासनाची चक्रे फिरली आणि १ हजार ५०० हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा झाले.

उमरखेड तालुक्यातील खरुस खुर्द आणि खरुस बुद्रुक या दोन गावांच्या नावांमधील साधर्म्यामुळे महसूल आणि प्रशासकीय नोंदींमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एका गावातील नागरिकांची नावे दुसऱ्या गावात, तर दुसऱ्या गावातील नागरिकांची नावे पहिल्या गावात नोंदवली गेल्याने दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना पीक विमा, सानुग्रह अनुदान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रशासकीय नोंदींतील त्रुटींमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

ही बाब जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा महाराजस्व अभियानाचे राज्य सदस्य आणि भाजपा नेते नितीन भुतडा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे खाजगी सचिव नीलेश श्रींगी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

या फोन कॉलनंतर प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली सुरू झाल्या. संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची दखल घेत आवश्यक कार्यवाही केली आणि अवघ्या १२ तासांत दोन्ही गावांतील नावांच्या नोंदींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यात आला. या कार्यवाहीमुळे १ हजार ५०० हून अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा झाले.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने दोन्ही गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रशासकीय त्रुटींमुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नितीन भुतडा यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला.

प्रशासकीय कामकाजात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी योग्य स्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *