उमरखेड तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विद्युत तारांच्या घर्षणातून लागलेल्या आगीत सुमारे १० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी तक्रार करूनही दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
उमरखेड तालुक्यातील चालगणी येथील शेतकरी देवदत्त अवधूत साळेकर (वय ४८) यांच्या शेतातील गट क्रमांक ४/१ मधील ऊस पिकाचे विद्युत तारांच्या घर्षणामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतातून गेलेल्या वीजवाहक तारा पूर्णपणे लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचे एकमेकांशी घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यातून आगीचा भडका उडाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
या आगीत सुमारे तीन एकर ऊस पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून, चालगणी येथील देवदत्त साळेकर यांच्यासह गुरफळी येथील इतर दोन शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकूण सुमारे १० एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
विशेष म्हणजे, लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याबाबत यापूर्वीच वीज वितरण कंपनीच्या ढाणकी येथील कार्यालयात लेखी अर्ज देऊन कळविण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाने या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच तारांना सुरक्षित करण्यासाठी दुसरा विद्युत खांब उभारून आवश्यक उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर शेतकरी देवदत्त अवधूत साळेकर यांनी वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा, झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला द्यावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्युत तारांची दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आधीच कोरड्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर या संकटामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आता तरी वीज वितरण कंपनी प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
