यावल नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी नोटिसांवरून सुरू असलेल्या वादावर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अतिक्रमण कारवाई पूर्णपणे नियमानुसार असून, विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच राजकारण करावे, असा टोला त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
पोळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच पोलीस प्रशासनावरील ताण लक्षात घेता अतिक्रमण कारवाई २५ सप्टेंबरनंतर करण्याचा निर्णय नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
‘महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५’ मधील कलम १७९, १८० आणि १८३ अन्वये सार्वजनिक रस्ते व जागांवरील अतिक्रमणे हटवण्याचा अधिकार मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाला आहे. यासाठी NHAI किंवा PWD च्या स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचे छायाताई पाटील यांनी स्पष्ट केले.
फैजपूर आणि रावेर नगरपालिकेतही प्रशासकीय नियमांनुसार अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मग यावलसाठी वेगळे नियम कसे, असा सवाल करत विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
शहरात चांगले काम झाले की आमदारांनी श्रेय घ्यायचे आणि अडचण आली की त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडायचे, असा टोला त्यांनी लगावला. अतिक्रमणधारकांनी थेट प्रशासनाकडे बाजू मांडल्यामुळे काही राजकीय मंडळींचा “तीळपापड” झाला असून, शहराच्या हितासाठी कायदेशीर मार्गाने होणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय कारवाईला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी नमूद केले.
