‘महसूल सप्ताह २०२५’ चे राहाता येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

शिर्डी: महसूल हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी मंत्री तथा अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महसूल विभागाने केलेली महत्त्वपूर्ण कामे:

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, “महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडवण्यात आले. खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले, शेती महामंडळाच्या जमिनी शासकीय कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या, गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करण्यात आला, तसेच भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये करण्यात आल्या. महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाइन करण्यात आल्या आहेत.”

नैसर्गिक आपत्तीत महसूल कर्मचाऱ्यांची भूमिका:

ते पुढे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल कर्मचारीच नागरिकांना सर्वप्रथम मदत करण्यासाठी धाव घेतात. त्यामुळे या विभागाचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे आणि ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे स्वतःहून दूर करावीत.”

जायकवाडी व निळवंडे धरणातून पाणी:

पाणीपुरवठ्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “जायकवाडी धरण पन्नास वर्षांत प्रथमच पूर्ण क्षमतेने भरले असून गोदावरी नदीतून पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातूनही कालव्यांमध्ये मुबलक पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरणांमध्ये प्रत्येकी १० टीएमसी पाणी आणले जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.”

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान:

कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, जीवंत सातबारा मोहीम, शर्तभंग जमीन नियमाकुल करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद, एग्रीस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र व भोगवटा २ चे भोगवटा १ मध्ये रूपांतर करण्याचे आदेश प्रदान करण्यात आले.

शिव रस्त्यांचे मोजणी नकाशे व महसूली गावाचा दर्जा:

तसेच, अस्तगाव, चोळकेवाडी, पडसवाळ या तीन किलोमीटर शिव रस्त्याच्या मोजणी नकाशांचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी या नव्याने घोषित महसूली गावाच्या अधिसूचनेचे वाटपही यावेळी ग्रामस्थांना करण्यात आले.

‘महसूल सप्ताह’ उपक्रमांचा उद्देश:

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी १ ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहातील उपक्रमांची आणि नागरिकांना देण्यात आलेल्या महसूल सेवांची माहिती दिली. या उपक्रमांचा उद्देश महसूल सेवा नागरिकांना विनासायास उपलब्ध करून देणे आहे. सध्या अनेक सेवा एका क्लिकवर ऑनलाइन मिळत असून, त्यात आणखी सेवांचा समावेश करण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांची घरी जाऊन केवायसी (KYC) प्रक्रिया राबवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व नागरिकांना शासन उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

(एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *