DHARASHIV | आज (दिनांक ३) एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्राँझपदक देऊन गौरव करण्यात आला आहे.
हा सन्मान आकांक्षित जिल्हा वर्गवारीतील धाराशिव जिल्ह्यासाठी आणि आकांक्षित तालुका वर्गवारीतील परंडा तालुक्यासाठी करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला आहे. नीती आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘संपूर्णता अभियाना’ अंतर्गत, विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
आयआयएम, नागपूर येथे आयोजित महसूल परिषद कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी पुजार यांना ‘आकांक्षित जिल्हा पुरस्कार’ श्रेणीत हे ब्राँझपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखालील धाराशिव जिल्ह्याने विकासाच्या अनेक पॅरामीटर्समध्ये लक्षणीय प्रगती केली आहे, ज्यामुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे.
प्रतिनिधी : आयुब शेख