प्रतिनिधी / नळदुर्ग
आगामी गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे सण उत्साहात व आनंदाने साजरे करण्यात यावेत. मात्र, या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे स्पष्ट निर्देश पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी दिले.

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देशमुख म्हणाले की, “धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही कृत्य होऊ नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. एकमेकांच्या धर्माचा सन्मान करा, कारण धर्म शिकवतो तोच माणुसकीचा आणि शांततेचा मार्ग आहे.”
कुठल्याही शंका किंवा अडचणीसाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. “सर्वांनी परस्पर सौहार्द जपत गणेशोत्सव व पैगंबर जयंती साजरे करावेत. पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, मात्र नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलीस निरीक्षक नंदकुमार सोळुंके, नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, महावितरण व वैद्यकीय विभागातील अधिकारी, धर्मगुरू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.