अहिल्यानगर : महाराष्ट्राचे आदर्श गाव हिवरे बाजार आणि येथील पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या कार्याची दखल आता सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. कृषी सुधारणांशी संबंधित तीन कायद्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीसमोर डॉ. पवार यांनी नुकतेच आपल्या कामाचे सादरीकरण केले. त्यांनी हिवरे बाजारच्या यशस्वी प्रयोगातून दारिद्र्य निर्मूलन, शेतकरी समृद्धी आणि गावाकडून शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवण्याचे धडे दिले.
चंदीगड येथे झालेल्या या सादरीकरणात डॉ. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये राबवलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. या प्रयोगांमध्ये आदर्श गाव योजना, जलयुक्त शिवार, पानी फाउंडेशन आणि ग्राम सामाजिक परिवर्तन यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. डॉ. पवार यांनी सांगितले की, या उपक्रमांमुळे केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक शिस्त, व्यसनमुक्ती आणि शिक्षण व आरोग्य सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे.
लखपती शेतकरी आणि थांबलेले स्थलांतर
डॉ. पवार यांनी आपल्या सादरीकरणात हिवरे बाजार मॉडेलचा प्रभाव आकडेवारीसह स्पष्ट केला. “या मॉडेलमुळे गावातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली, शेतकरी लखपती झाले आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबले आहे,” असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नावरही हे मॉडेल एक प्रभावी उपाय ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाणी आणि मातीचे व्यवस्थापन
डॉ. पवार यांनी पाणी व्यवस्थापन, भूजल संवर्धन, पिकांचे नियोजन आणि मातीच्या आरोग्यासारख्या तांत्रिक मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. अतिवृष्टीमुळे होणारे सेंद्रिय कर्बचे नुकसान आणि त्याचा पिकांच्या उत्पादकतेवर होणारा नकारात्मक परिणाम यावर त्यांनी समितीचे लक्ष वेधले. “अतिरिक्त संपत्तीसोबत आध्यात्मिक संस्कारही आवश्यक आहेत, अन्यथा व्यसनाधीनता वाढते,” या त्यांच्या विचारांनी सर्वांचे लक्ष वेधले. हिवरे बाजारमध्ये सुरू झालेल्या माती आणि पाणी आरोग्य प्रयोगशाळेची माहिती देऊन त्यांनी ‘आनंददायी स्वयंपाकघर आणि आरोग्यदायी कुटुंब’ या संकल्पनेवर भर दिला.
समिती लवकरच हिवरे बाजारला भेट देणार
डॉ. पवार यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने हिवरे बाजारला प्रत्यक्ष भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये चेअरमन माजी न्यायाधीश नवाब सिंह, शास्त्रज्ञ देविंदर शर्मा, सधन शेतकरी रणजीतसिंह घुमान, निवृत्त आयपीएस बी.एस. संधू आणि सुखपाल सिंह यांचा समावेश आहे. या समितीच्या भेटीने हिवरे बाजार मॉडेलला राष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळणार आहे.
‘आदर्श गाव’ सप्तसूत्री अभ्यासक्रमात समाविष्ट करा
डॉ. पवार यांनी समितीला केलेल्या शिफारशींपैकी एक महत्त्वाची शिफारस म्हणजे, ‘आदर्श गाव योजनेतील सप्तसूत्री’ अभ्यासक्रमात समाविष्ट करावी. तसेच, मोफत धोरणांमुळे शेतीवर होणारा परिणाम आणि शेतमजुरांची कमतरता लक्षात घेता, त्यांनी मनरेगा योजना शेती आणि मजुरांशी जोडण्याची गरजही व्यक्त केली. रासायनिक खते आणि तणनाशकांचा बेसुमार वापर थांबवण्यासाठी कठोर निर्बंधांची मागणीही त्यांनी केली.
या सादरीकरणाने हिवरे बाजारने एक वेगळी ओळख निर्माण केली असून, या मॉडेलमुळे देशातील अनेक शेतकरी गावांना प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर
