आपला भारत देश धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. याच विविधतेत एकता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. आदर्श गाव हिवरे बाजार एक गाव एक गणपती ही परंपरा जपत आहे.
आदर्शगाव हिवरेबाजार येथील चौपाळा श्री गणेश मंदिर हे पवित्र क्षेत्र आपल्या अध्यात्मिक तेजाने भक्तांना आकर्षित करत आहे. नगर शहरापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर, शांत नयनरम्य, डोंगराळ परिसरात वसलेले एक मनमोहक आणि पवित्र स्थान आहे. निसर्गरम्य परिसरात स्थित चौपाळा श्री. गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सप्टेंबर २०१२ रोजी सुरू करण्यात आले. कळसासह २० एप्रिल २०१३ रोजी काम पूर्ण झाले. गाभारा क्षेत्रफळ ८१ व सभामंडप क्षेत्रफळ ९०० चौरस फुट बांधकाम हिवरे बाजार, वडगाव आमली, दैठणे-गुंजाळ, टाकळी-खातगावच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम केले आहे. कळस २१ फूट उंच आहे.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दुरूनच या गणेशाचे दर्शन घडते. पाहता क्षणीच ही मूर्ती मनात घर करते. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय आनंदी आणि मनाला शांती देणारे आहे. गणेशोत्सव काळात मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असल्याचीही काही भाविकांची श्रद्धा आहे. काहींच्या मते हा गणपती नवसाला पावतो, अशी या गणपतीची ओळख आहे.
चौपाळा श्री गणेश मंदिराचा परिसर हा गूढ शांतता आणि वृक्षराजीने सजलेला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील श्री. गणेशाची मूर्ती प्रसन्न असून लक्ष वेधून घेते, चौपाळा गणेश मंदिर हे एक जागृत व सिद्ध मंदिर असून चारही गावचे ग्रामस्थ नित्यनियमाने दर्शनासाठी येतात. शेतातील टोमॅटो, संत्री, मोसंबी व इतर शेतमालाचा पहिला तोडा गणपतीला वाहतात, त्यामुळे चांगला भाव व भरघोस उत्पन्न मिळते अशी शेतकऱ्यांची भावना आहे. तसेच यौवनांच्या (अहमदशाह, निजामशाह, मोगलाई) अनेक आक्रमनांपासून गणपतीनेच चार गावांचे संरक्षण केले अशी भावना लोकांची आजही आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून चौपाळा गणपती प्रसिद्ध आहे. येथे आलेल्या भाविकांचे समाधान व भक्तीभाव द्विगुणित होतो व आत्मिक आनंद मिळतो. हिवरेबाजारच्या पश्चिमेला एक गवताळ पठार आहे. हिवरेबाजार, दैठणे-गुंजाळ, वडगावआमली, टाकळी-खातगाव या चार गावांच्या सीमेवर सदर पठार आहे म्हणून त्याला चौपाळा नाव पडले.हा गणपती कसा तयार झाला याची आख्यायिका -एकोणीसाव्या शतकात बीदरच्या मुसलमान सलंतनीच्या जाचाला कंटाळून दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शिवभक्त गवळ्यांनी (गाव आळंद जिल्हा बीदर) येथून स्थलांतर केलं. गाव सोडून ते फिरत फिरत हिवरेबाजारच्या गवताळ पठारावर आले. भरपूर गवत व शेजारी वाहणारा झरा पाहून त्यांनी पठारावर वस्ती केली. गो-पालन हा लिंगायत गवळ्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्याचबरोबर मेंढीपालनही ते करायचे. नगर व आसपासच्या गावात गाई म्हशीचे दूध विक्रीसाठी ते जायचे. दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ- ताक, दही, तूप तयार करून विक्री करायचे. दही, ताक साठविण्याचे अनेक रांजण चौपाळ्याच्या पठारावर पहायला मिळतात. एकदा लिंगाप्पा बसाप्पा गवळी यांनी पिंपळाच्या वृक्षाखाली स्वयंभू श्री. गणेशाची स्थापना केली. छोटसं मंदिर बांधले. पेंढारी लोक दरोडा टाकायचे. त्यासाठी पैसे ते जमिनीत गाडग्यात टाकून पुरायचे. संकट निवारणासाठी त्यांनी चौपाळा गणेश मंदिर बांधले. त्याची रोज पुजाअर्चा करायचे. जमिनीत पुरलेल्या सुवर्णमुद्राचे गाडगे एका गुराख्याला सापडल्याचेही गावकरी सांगतात. हिवरेबाजारच्या भरणाऱ्या बाजारात व्यापारी दुध, दही, ताक व तूप गवळ्याकडून घ्यायचे. नंतर दुष्काळ व महामारीच्या साथीमुळे गवळ्यांनी आपले कुटुंब कबिला घेऊन हिवरेबाजार गाव सोडले. १९०५ साली ही घराणी मिरीमाका (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथे स्थायिक झाली. काही भाळवणी, पारनेर व अमळनेरला गेले. भाळवणीतील नागेश्वर मंदिराची स्थापना व बांधकाम गवळी समाजानेच केले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
ब्रम्हांडशास्त्रज्ञ कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजार ग्रामस्थांनी कलशारोहण समारंभ दि.१ मे २०१३ रोजी जडेय शांतलीगेश्वर महास्वामीजी बिदर कर्नाटक,पुज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी कन्हेरी मठ कोल्हापूर,ह.भ.प.विठ्ठल महाराज देशमुख,ह.भ.प.विठ्ठल महाराज घुले,नारायण महाराज जाधव यांचे शुभहस्ते झाले. चौपाळा गणेश हिवरेबाजार, वडगाव आमली, टाकळी खातगाव, दैठणे गुंजाळ ग्रामस्थांचा विघ्नहर्ता व सुखकर्ता देव आहे.
