नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेने ग्रामविकास अधिकारी नरेश मट्टामि यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. विशेषतः खुबादा ग्रामपंचायतमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्याचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते मट्टामि यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या अथक मेहनतीमुळे आणि चांगल्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
मट्टामि सध्या भंडारा (ता.सावनेर) ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी केलेले काम अनेक ग्रामविकास अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असून, भविष्यातही ते याच जोमाने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधि मंगेश उराडे,
एनटीवी न्यूज़ मराठी, नागपुर.