सेनगाव (हिंगोली) :
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील भाजप शेतकरी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष भागवत मुंढे यांनी गावातील काही नागरिकांना कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावामध्ये सर्वत्र शोककळा पसरली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
आत्महत्या करण्यापूर्वी भागवत मुंढे यांनी एक व्हिडिओ बनवून तो पत्रकारांना पाठवला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. त्यांच्यावर खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल केले जात आहेत, याला कंटाळून ते आपले जीवन संपवत आहेत. भागवत मुंढे हे शेतकरी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष असण्यासोबतच गावातील रोजगार सेवक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी गावामध्ये अनेक विकास कामे केली होती. मात्र, गावातील काही नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यांच्यावर सुरू असलेल्या त्रासामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
मदतीसाठी संपर्क, पण..
विष प्राशन केल्यानंतर भागवत मुंढे यांनी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच आमदार मुटकुळे यांनी तात्काळ सेनगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली आणि अवघ्या दोन तासांमध्ये त्यांना शोधून सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथे नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ग्रामसभेतील वादाचा व्हिडिओ
भागवत मुंढे यांनी गावातील ग्रामसभेत झालेल्या वादाचा एक व्हिडिओही पत्रकारांना पाठवला होता. या व्हिडिओमध्ये गावातील काही व्यक्ती त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत. याच त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर सावरखेडा गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सेनगाव पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे. भागवत मुंढे यांच्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पीएसआय खंदारे, बीट जमादार राजेश जाधव, तुळशीराम वंजारे, तुकाराम मारकळ आणि गोपनीय शाखेचे काशिनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.