- श्री मयुरेश्वर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची मनमोहक सजावट.

मोरगाव: अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावचा श्री मयुरेश्वराचा ‘राजेशाही दसरा’ उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवाला राजाश्रय लाभला असून, संपूर्ण राज्यात याचे विशेष आकर्षण आहे. हा सण मोरगाव येथील प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
मंगलमय वातावरणात उत्सवाची सुरुवात
आज पहाटेच सनई चौघड्यांचे मंगलमय सूर, शोभेच्या दारूची आतषबाजी आणि पाच मानाच्या तोफांची सलामी देत उत्सवाला सुरुवात झाली. हा सोहळा मोरगावच्या दसऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे.

ग्रामसभेत नियोजनावर चर्चा
सालाबादप्रमाणे दसरा उत्सवाच्या नियोजनासाठी आज सकाळी मंदिराच्या प्रांगणात संपूर्ण गावकऱ्यांची ग्रामसभा पार पडली. रात्री होणारी मिरवणूक आणि शोभेच्या दारूचे प्रदर्शन याबद्दल ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. जय गणेश प्रतिष्ठान आणि श्री मोरया प्रतिष्ठान यांच्यावतीने उत्सवाच्या विविध जबाबदाऱ्या स्वीकारण्यात आल्या आहेत.

मानकरी आणि हजारो गावकऱ्यांची उपस्थिती
आज सकाळी झालेल्या बैठकीला हजारो गावकरी आवर्जून उपस्थित होते. मंदिर पुजारी श्री किशोर वाघ यांनी बैठकीत सविस्तर माहिती दिली. यावेळी उत्सवातील मानकरी यांना मानाचा शिधा वाटप करण्यात आला.

मंदिराला यात्रेचे स्वरूप
सणाचे निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर, तसेच मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर सभा मंडपाच्या बाहेरील बाजूला रंगीबेरंगी फुलांची मनमोहक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण मोरगावला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

लाखोंच्या संख्येने भाविक दाखल
मोरगावचा हा भव्य ‘राजेशाही दसरा’ उत्सव पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर कर्नाटक राज्यासह देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.
प्रतिनिधी – मनोहर तावरे
एन टीव्ही न्यूज, मोरगाव, पुणे.