पुलगाव (वर्धा): पुलगाव शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अक्षय माहोरे नामक युवकाची तीन जणांनी मिळून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अक्षय माहोरे असे मृत युवकाचे नाव असून, तो स्थानिक तेलघाणी परिसरातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी यश घनमोडे, क्रिश घनमोडे आणि परेश वाघाडे या तीन युवकांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी कवठा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अपराध क्रमांक ७८६(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनकर आणि पोलीस उपनिरीक्षक सदानंद वडतकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस त्या दिशेने अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे पुलगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रतिनिधी जावेद खान,
एनटीव्ही न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा.