जामखेड प्रतिनिधी, दि १४ ऑक्टोबर
कर्जत-जामखेड – गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जामखेड तालुक्यातील मोहरी तलावाचे झालेले नुकसान आणि जिल्ह्यातील कुकडी व सीना कालव्यांवरील बंधाऱ्यांची दुरवस्था या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी तातडीने पाऊले उचलली आहेत. अतिवृष्टीमुळे फुटलेल्या मोहरी (ता. जामखेड) तलावाची दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चातून तयारी दर्शवली असून, त्यासाठी जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली आहे. तसेच कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करणारे पत्रही त्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे. या मागणीनुसार जलसंपदा विभागाने प्रदेश आणि मंडळ स्तरावरून तातडीने प्रस्ताव मागवण्याचे आदेश दिले आहेत.
मोहरी तलावाची स्वखर्चातून दुरुस्तीची तयारी
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहरी तलावाच्या सांडव्याचा भराव आणि लगतच्या सुरक्षा भिंतीला मोठे भगदाड पडले होते, ज्यामुळे तलाव फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यावेळी आ. पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, आता कायमस्वरूपी दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे, अन्यथा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. यामुळेच, सरकारी दिरंगाई झाल्यास, जलसंपदा विभागाच्या देखरेखीखाली स्वखर्चातून दुरुस्ती करण्याची तयारी आ. रोहित पवार यांनी दर्शवली आहे आणि तसे पत्र विभागाला दिले आहे. विभागानेही याबाबतचा प्रस्ताव तातडीने मागवला आहे.
कुकडी व सीना कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी
अतिवृष्टीमुळे सीना उजवा कालवा बाभुळगाव खालसा आणि माहीजळगाव येथे फुटून शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच कुकडी डावा कालवा आणि चिलवडी शाखा कालवाही काही ठिकाणी फुटला आहे. रब्बी आणि आगामी हंगामातील पाणी आवर्तनासाठी या महत्त्वाच्या कालव्यांची तत्काळ दुरुस्ती आवश्यक आहे. यासाठी सरकारने पुरेसा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आ. पवार यांनी केली आहे.
सीना नदीवरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा
सीना नदीवरील १३ बंधाऱ्यांपैकी अनेक बंधाऱ्यांच्या बाजूचा भराव वाहून गेल्याने लगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामासाठी हे सर्व बंधारे महत्त्वाचे असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी निधी देण्याची मागणीही आ. रोहित पवार यांनी केली आहे. कालव्यांच्या आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने मागवून घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाने यावर दिले आहेत.
इतर बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू
जलसंपदा, जलसंधारण, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाकडील अनेक बंधाऱ्यांचेही अतिवृष्टीने नुकसान झाले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठीही आ. रोहित पवार यांनी सरकारकडे मागणी केली आहे. या बंधाऱ्यांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे.
आमदार रोहित पवार (कर्जत-जामखेड) यांची प्रतिक्रिया
”मोहरी तलावाची तातडीने दुरुस्ती होणं आवश्यक आहे. सरकारकडून उशीर होत असेल तर ग्रामस्थांच्या मदतीने आमची स्वखर्चातून दुरुस्ती करण्याची तयारी आहे आणि तशी परवानगी आम्ही मागितली आहे. सीना कालव्याची आणि त्यावरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासकीय निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. या कामास उशीर झाल्यास पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे सरकारने तातडीने कार्यवाही करावी, ही अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या इतर बंधाऱ्यांच्याही दुरुस्तीची विनंती सरकारला केली असून, त्याचेही सर्वेक्षण सुरु आहे.”
नंदु परदेशी, जिल्हा प्रतिनिधी,
एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.