धाराशिव, प्रतिनिधी आयुब शेख

दि. 21 ऑक्टोबर 2025


धाराशिव (उस्मानाबाद): जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकाची वाढ खुंटणे, कीड प्रादुर्भाव आणि पाण्याचा दीर्घकाळ ताण या कारणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विधायक कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी राज्याचे पणन मंत्री मा. जयकुमारजी रावल यांना पत्र लिहून सोयाबीनसाठी हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करण्याची तसेच भावांतर योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

आमदार घाडगे-पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की —

“राज्यात सोयाबीनचा हमीभाव ५३२८ रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला असताना सध्या खुल्या बाजारात व्यापारी केवळ ३००० ते ३५०० रुपयांत सोयाबीन खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल सुमारे १८०० रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. हमीभाव केंद्र अद्याप सुरु नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात पिके विकावी लागत आहेत.”

तसेच त्यांनी पुढे नमूद केले आहे की,

“विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात विक्री केल्यास त्या फरकाची रक्कम ‘भावांतर योजने’तून देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे त्या घोषणेची अमलबजावणी तातडीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

धाराशिवसह राज्यातील 31 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढले असून दिवाळीपूर्वी मदतीची अपेक्षा होती. पण हमीभाव केंद्रे सुरू न झाल्याने आणि बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

आमदार घाडगे-पाटील यांनी “राज्यात सोयाबीनसह इतर पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करून हमीभाव व विक्री किंमतीतील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी”, अशी मागणी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

प्रतिनिधी आयुब शेख,

एनटीव्ही न्यूज मराठी, धाराशीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *