- ‘महायुतीला प्राधान्य, पण स्वबळाची तयारी ठेवा’ – ॲड. अशोक पटवर्धन.

उमरगा (सचिन बिद्री: धाराशिव): आगामी उमरगा व मुरूम नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक मंगळवार, दि. २८ रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेच्या मराठवाडा विभागीय सचिव ॲड. अशोक पटवर्धन यांनी ‘महायुतीला प्राधान्य, पण स्वबळावर लढण्याची तयारी’ ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
ॲड. पटवर्धन म्हणाले की, “आगामी निवडणुका महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) म्हणून लढविण्याचे स्पष्ट आदेश पक्षाकडून आले आहेत आणि स्थानिक स्तरावरही महायुतीलाच प्राधान्य दिले जाईल.” मात्र, काही कारणांमुळे ऐनवेळी युती शक्य न झाल्यास कार्यकर्त्यांनी गाफील न राहता स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

महायुतीतील चर्चेला सकारात्मक प्रतिसाद
यावेळी बोलताना प्रा. रविंद्र गायकवाड यांनी माहिती दिली की, “जिल्हा व तालुका पातळीवरील महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.” कार्यकर्त्यांनी उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करावेत. तसेच, प्रचारादरम्यान सर्व जुने आणि नवीन पदाधिकारी यांनी समन्वय राखून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि पदनियुक्ती
या बैठकीस शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकाते, युवती सेना निरीक्षक ॲड. आकांक्षा चौगुले यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा सेना निरीक्षक किरण गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी आणि आभार प्रदर्शन भगत माळी यांनी केले.
नवीन पदनियुक्ती: अंबरनगर येथील शिवसैनिक कुमार लक्ष्मण पवार यांची शिवसेना बंजारा सेल मुरूम विभागप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून, मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, सिद्रामप्पा चिंचोळे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी सचिन बिद्री,
एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशीव.
