MUMBAI | मराठी हिंदी वाद हा महाराष्ट्रातील जनतेला नवा नाही. हा वाद जसजशा निवडणुका जवळ येतात त्यावेळी राजकीय नेते आपल्या सोयीनुसार उकरून काढत असतात. याला नव्याने खमंग फोडणी देत याचा वापर आपल्या मतांसाठी वापर करत असतात. असाच एक प्रकार नव्याने समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी एका मराठी म्हणीचा आधार घेत या वादाला नव्याने तोंड फोडले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषतः मुंबई आणि आसपासच्या भागात स्थानिक विरुद्ध परराज्यीय असा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. अलीकडेच उत्तर भारतीय समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी मराठी म्हणीचा संदर्भ देत हिंदीतून भाष्य केलं. मात्र त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधकांनी शिंदे गट आणि सुर्वे यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. “मराठी माझी मातृभूमी, माझी आई आहे, पण उत्तर भारत माझी मावशी आहे. एक वेळ आई गेली तरी चालते, पण मावशी मरता कामा नये, कारण मावशी जास्त प्रेम करते. तुम्ही मला जे प्रेम दिलं आहे तेच प्रेम माझ्या सहकाऱ्यांनाही द्या.” असे प्रकाश सुर्वे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी, मुंबई.
