• अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन.
  • गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
  • त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली.
  • गावच्या सरपंचपदापासून आमदारपदापर्यंतचा त्यांचा कर्तृत्ववान प्रवास.

SOLAPUR | अक्कलकोटचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शुक्रवारी दुपारी ३ वाजता मूळ गावी कुमठे येथे केले जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. गावच्या सरपंचपदापासून आमदारपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत कर्तृत्ववान राहिला. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्हा बँकेचे ते सलग ३५ वर्ष संचालक होते आणि एकवेळ उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. ते श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि मार्केट कमिटीचे सभापतीही होते. अक्कलकोट तालुक्यात भाजपची मजबूत बांधणी करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी काम करणारे ते खंबीर नेतृत्व होते, आणि स्व. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ८७व्या वर्षापर्यंत त्यांचे राजकीय-सामाजिक कार्य सातत्याने सुरु होते.

एनटीव्ही न्यूज मराठी, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *