• जामखेड शहर व वाड्यावस्त्यांच्या विकासासाठी सर्व मागण्या पूर्ण करणार..!
  • ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही..!

जामखेड प्रतिनिधी (दि. २ डिसेंबर)

अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना राजकीय ‘हेडमास्तर’ संबोधत, जामखेडच्या विकासासाठी शिंदे जे मागतील ते सर्व पूर्ण करण्याची ग्वाही दिली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राम शिंदे ‘हेडमास्तर’, फडणवीस ‘विद्यार्थी’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “रामभाऊ शिंदे यांनी जामखेड शहर व सात वाड्यावस्त्यांच्या विकासासाठी माझ्याकडे विविध मागण्या केल्या आहेत, त्या सर्व मी पूर्ण करेल.” त्यांनी यावेळी राम शिंदे यांचा उल्लेख करत म्हटले की, “आता ते हेडमास्तर आहेत तर मी विद्यार्थी आहे. ते सांगतील व मागतील तेच होईल व मला द्यावेच लागेल.”

विधानसभेची चूक नगरपालिकेत भरून काढा

  • नगराध्यक्षपदासाठी आवाहन: “विधानसभेची चूक नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष करून भरून काढा. मी सभापती राम शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
  • घरकुल योजना: एकही गरीब घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही. ज्यांनी जागा नसताना अतिक्रमण करून घरे बांधली आहेत, त्यांना ती नियमित करून उतारा देण्याचा शासन निर्णय केला आहे.

‘लाडकी बहीण’ आणि ‘लखपती दीदी’ योजना

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दल स्पष्टीकरण दिले. “विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या खोट्या अफवा पसरवत आहेत, परंतु एक वर्ष होऊन गेले तरी ती योजना चालू आहे. देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) जोपर्यंत आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.” ते पुढे म्हणाले, “आता लाडक्या बहिणींना लखपती दीदी योजनेतून ५० लाख महिला लखपती दीदी केल्या आहेत. पुढील वर्षात एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”

प्रलंबित राष्ट्रीय महामार्ग कामावर लक्ष

यावेळी बोलताना आष्टी, पाटोदा, शिरूरचे आमदार सुरेश धस यांनी जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असून, ठेकेदार दररोज फक्त दोन फूट काम करतोय, ज्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तात्काळ दखल घेऊन, सदर ठेकेदार काम लवकर का करत नाही याबाबत आचारसंहिता संपताच इलाज केला जाईल, असे आश्वासन दिले.

यावेळी सभेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार सुरेश धस, आमदार योगेश टिळेकर, प्रा. मधुकर राळेभात तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते.


प्रतिनिधी नंदु परदेशी,

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *