DHARASHIV| आज दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, येणेगुर येथे रोटरी क्लब उमरगा व साने गुरुजी कथामाला, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी कथामाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. हरके सर होते. यावेळी रोटरी क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी, आदर्श विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. सोमशंकर महाजन तसेच प्रा. सौ. सुनंदा महाजन आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजू जोशी सरांनी केले, तर मनोगत सोमशंकर महाजन सरांनी व्यक्त केले. आजची साने गुरुजींची कथा प्रा. सौ. सुनंदा महाजन यांनी “अर्धनारी नटेश्वर” या विषयावर अत्यंत प्रभावी व भावनिक शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडली.
आईचे संस्कार, चांगले काम करताना कधीही लाज वाटू नये, गुरुजींचे तीन गुरु, शाळेत नोकरी करत असताना विद्यार्थ्यांना केलेली मदत, शिक्षण घेतानाची हलाखीची परिस्थिती, प्रेमळ व सेवाभावी स्वभाव अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना अभावग्रस्त परिस्थितीतही शिक्षण कसे घ्यावे याचे मोलाचे धडे दिले.
कथेवर आधारित प्रश्नोत्तरे घेण्यात आली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पेन देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गोपाळ गेडाम सरांनी केले. या कार्यक्रमासाठी संचालक आनंदराज बिराजदार, शंकर हुळमजगे, महेश खंडाळकर, चंद्रकांत बिरादार, सौरभ उटगे, गोविंद मेंडेबणे, प्रदीप शिंदे, कोमल कीर्तने, मारुती जगताप, सुरेश जाधव, तानाजी मदने यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रेरणादायी प्रार्थनेने करण्यात आली.
(सचिन बिद्री:उमरगा)
