• उमरखेडमध्ये वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे २ लाखांचे नुकसान..!

उमरखेड प्रतिनिधी | दि. १० मार्च २०२६

यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील नागापूर रूपाला शेत शिवारात मंगळवारी (दि. १० मार्च) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत काढणीला आलेला तीन एकर गहू जळून खाक झाला असून, दोन शेतकऱ्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाऱ्यामुळे तारांचे घर्षण अन् ठिणगी पडली

मिळालेल्या माहितीनुसार, नागापूर शिवारातील रेहाना सय्यद अख्तर यांच्या शेतावरून वीज वितरण कंपनीच्या जिवंत विद्युत तारा गेल्या आहेत. या तारा अत्यंत लोंबकळलेल्या स्थितीत होत्या. दुपारी सुटलेल्या जोमदार वाऱ्यामुळे या तारांचे एकमेकांशी घर्षण झाले आणि त्यातून निघालेली ठिणगी खाली असलेल्या पिकावर पडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

अग्निशमन दलाची धाव; पुढील अनर्थ टळला

आग लागताच शेतकरी आणि मजुरांनी ती विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच उमरखेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिताफीने आग आटोक्यात आणल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांचा काढणीला आलेला शेकडो एकर गहू वाचला. मात्र, तोपर्यंत दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते:

  • रेहाना सय्यद अख्तर: २ एकर गहू जळून खाक.
  • रोहित तामसकर: १ एकर गहू जळून खाक.

महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा संताप

हलगर्जीपणाचा फटका: अनेक शेतांमध्ये वीज वितरण कंपनीच्या सव्र्हिस लाईन लोंबकळत आहेत. या तारा दुरुस्त करण्यासाठी शेतकरी वारंवार महावितरणच्या कार्यालयात चकरा मारतात, अर्ज देतात; परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. महावितरणच्या याच हलगर्जीपणामुळे आज दोन शेतकऱ्यांचे स्वप्न राख झाले असून, त्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आहे.


वृत्त संकलन: ताहेर मिर्झा, उमरखेड, यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *