- वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन..!
बाळापूर प्रतिनिधी | दि. २८ जानेवारी
बाळापूर (अकोला): २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख न करून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

या संदर्भात, आज, २७ जानेवारी २०२६ रोजी बाळापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी, बाळापूर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कर्तव्यावर असलेल्या महिला वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आठवून दिले, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले. हे कृत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा थेट अवमान असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने निवेदनाद्वारे दिला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा सरचिटनीस मिलिंद इंगळे, संजय शेषराव उमाळे, गुलाबराव उमाळे, माजी नगर अध्यक्ष ऐनोद्दीन खतीब, रवी नाईक, रामपाल तायडे, अनावर भाई, सलीम कुरेशी, अरबाज खान, देवानंद इंगळे, कृष्णा तेलगोटे, राज अवचार, जयंत उमाळे, सिद्धू गडेकर, दीपक उमाळे, राजू नाईक, संतोष उपरावत, धर्मवीर उमाळे, नाखी वानखेडे, देवानंद उमाळे, भरत ढोले, सारिपुत्त वानखेडे , सुपडा नाटकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी अमोल जामोदे, बाळापुर, अकोला.
