AKOLA | अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. माना पोलीस स्टेशन हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना तब्बल तीन जिल्ह्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
माना पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार जमीर अहमद मुमताज अहमद (रा. माना, ता. मूर्तिजापूर) जो गौवंश तस्करी व चोरी प्रकरणातील आरोपी आहे, तसेच शरीराविरुद्ध गुन्हे व अवैध दारू विक्री करणारा उमेश सुरेश गोंडाणे (रा. माना, ता. मूर्तिजापूर) या दोघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी, मूर्तिजापूर यांच्या आदेशानुसार या दोघांना अकोला, वाशिम व अमरावती या तीन जिल्ह्यांतून ६ महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पोलिस हवालदार मनोहर इंगळे व कॉन्स्टेबल सुशील आठवले यांनी यशस्वीपणे पार पाडली. आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता राखण्यासाठी अशा गुन्हेगारांवर एमपीडीए आणि तडीपारीसारख्या कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक अचिंत चांडक यांनी दिला आहे.
प्रतिनिधी – मूर्तिजापूर, अकोला.
