अकोला पोलीस दलाने पुन्हा एकदा राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अकोला शहरातील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रातील सशस्त्र जबरी चोरीचा अवघ्या 72 तासांत छडा लावणाऱ्या तपास पथकाची जुलै महिन्यातील ‘उत्कृष्ट गुन्हे उकल’ म्हणून महाराष्ट्र स्तरावर निवड करण्यात आली आहे.
अकोला शहरातील आदर्श कॉलनी येथील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रात झालेल्या सशस्त्र जबरी चोरीचा अवघ्या 72 तासांत छडा लावून आरोपीला जेरबंद करण्याची कारवाई अकोला जिल्हा पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
विशेष पोलीस अधीक्षक, अकोला श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली 330 पेक्षा अधिक CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत ही कारवाई करण्यात आली. या उत्कृष्ट तपासाची दखल घेत सदर गुन्ह्याची माहे जुलैमधील ‘उत्कृष्ट गुन्हे उकल’ म्हणून महाराष्ट्र स्तरावर निवड करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे तपास पथकातील DYSP शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, दि. 07 मे 2026 रोजी दुपारी आदर्श कॉलनी, अकोला येथील श्री सप्तश्रृंगी अलंकार केंद्रात चेहरा झाकलेल्या आरोपीने पिस्टल व लोखंडी रॉडचा धाक दाखवून सशस्त्र जबरी चोरी केली. या घटनेत 69.90 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
गुन्ह्याच्या तपासात 330 पेक्षा अधिक CCTV फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या पलायनाचा मार्ग अकोला ते भुसावळपर्यंत निश्चित करण्यात आला. तांत्रिक तपासासोबतच प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रोहनसिंग सतनामसिंग बावरा यास दि. 11 मे 2026 रोजी भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 170 ग्रॅम सोन्याचे दागिने, 500 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, असा एकूण 27.25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यात 13 साक्षीदारांची तपासणी करून दि. 29 जून 2026 रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
यापूर्वी माहे मे महिन्यात अकोट येथील बहुचर्चित कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचाही अकोला पोलीस दलाने यशस्वी तपास केला होता. अकोट शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बारगण येथील प्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेली लाखो रुपयांची चोरी उघडकीस आणून आरोपीला बेड्या ठोकणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा दि. 17 जुलै 2026 रोजी मुंबई येथे गौरव करण्यात आला होता. माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी आपल्या दालनात या तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले होते.
आता पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई येथे DYSP शंकर शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल खुशाल नेमाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल राज चंदेल यांना मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अकोला जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे, ज्याची दोनदा राज्यस्तरीय निवड झाली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी टीमचे अभिनंदन केले आहे.
