फिनलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या दिशाने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगावची रहिवासी दिशा विजय पाटील हिने कांस्यपदक पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील मूळ रहिवासी आणि भारतीय बॉक्सिंग संघाची खेळाडू दिशा विजय पाटील हिने फिनलंडमधील आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे भारताचा गौरव उंचावला असून, तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फिनलंड येथे २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित ४६ व्या आंतरराष्ट्रीय टॅमर बॉक्सिंग स्पर्धेत दिशा विजय पाटील हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ६० किलो वजनी गटात तिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांच्याशी स्पर्धा करताना दिशाने उत्कृष्ट खेळ आणि जिद्दीचे प्रदर्शन केले. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह किनगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश तिच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीचे फलित आहे. तिच्या कामगिरीमुळे कुटुंबाची तसेच देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.
दिशाने यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच यशस्वी कामगिरी करीत पदकांची मालिका कायम ठेवावी आणि लवकरच जागतिक विजेतेपद पटकावून भारताचे नाव जगभरात उंचवावे, अशा शुभेच्छा तिच्यावर दिल्या जात आहेत.
