अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असलेले अवैध जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापूर शहर अध्यक्ष तसव्वर खान तसलीम खान यांनी पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत पिंजर परिसरात अवैध जुगार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जुगारामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, कष्टाने कमावलेले पैसे जुगारात गमावले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच जुगारामध्ये उधारी झालेल्या रकमेच्या वसुलीसाठी काही व्यक्तींकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अवैध धंदे चालविणाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होणार नाही, असा दावा केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची पोलिस प्रशासनाने तात्काळ चौकशी करून पिंजर येथील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करावी आणि हे अड्डे कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, मुर्तिजापूर विभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला तसेच पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *