यावल येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या सातपुडा तडवी आदिवासी रक्षा अर्थात STAR बहुउद्देशीय संस्थेला अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या विविध अडीअडचणी सोडविण्यासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

संस्थेच्या अधिकृत नोंदणी प्रमाणपत्राचा स्वीकार करण्यासाठी समाजातील पदाधिकारी, सदस्य आणि हितचिंतक उपस्थित होते. यावेळी शब्बीरदादा, सरवर, शरीफ, नवाज दादा, राजू तुराब, मिनल राजू, पत्रकार फिरोज तडवी, ॲड. सौरभ आणि ॲड. संगीता आदी उपस्थित होते.

STAR संस्थेच्या माध्यमातून तडवी भिल्ल समाजातील नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर पाठपुरावा केला जाणार आहे. शिक्षण, सामाजिक विकास, शासकीय योजनांचा लाभ तसेच गरजू घटकांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे.

बालसंगोपन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांना कोणताही अनावश्यक खर्च न करता आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शासकीय योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, अर्ज व कागदपत्रांच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करणे आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणे, यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे.

यावेळी उपस्थितांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत एकजुटीने आणि निःस्वार्थ भावनेने समाजहिताचे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. STAR संस्था सातपुडा परिसरातील तडवी भिल्ल समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

असलम तडवी यांनी संस्थेच्या कार्याबाबत मनोगत व्यक्त करत उपस्थित सदस्यांचे आभार मानले. संस्थेच्या पुढील वाटचालीत समाजातील सर्व नागरिकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *