उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील २००९ मधील खून प्रकरणातील गेल्या १७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उमरखेड डी.बी. पथकाने अखेर ताब्यात घेतले आहे. आरोपी आंध्रप्रदेशात स्वतःचे अस्तित्व लपवून व नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींच्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. २७ जानेवारी २००९ रोजी विडुळ येथील मारोती रामा कलाणे, वय ४८ वर्ष, यांचा गोपी बाबरू डाके, मारोती जयवंता डाके आणि डिस्को धुळबाजी दवणे या तिघांनी मारहाण करून शेल्याने गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी मयताची पत्नी सुलोचना मारोती कलाणे यांच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १६/२००९, कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
यातील आरोपी गोपी बाबरू डाके याला अटक होऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आरोपी नागराज उर्फ डिस्को धुळबाजी दवणे, वय ४० वर्ष, हा गुन्हा घडल्यापासून १७ वर्षे फरार होता. तो आंध्रप्रदेशातील निजामाबाद जिल्ह्यातील आरमूर तालुक्यातील भिमगल येथे कुटुंबासह नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांना मिळाली.
गोपनीय माहितीगार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीवर लक्ष ठेवण्यात आले. आरोपी विडुळ येथे आपल्या मूळ गावी येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून गावात पोहोचण्यापूर्वी त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अपर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदेपाटील आणि उमरखेड पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार दिलीप चव्हाण, पो.हवा. चंदन जाधव, पो.कॉ. संघशिल टेंभरे, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. नितेश लांडे आणि चापोकॉ राजीव मेटकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
