यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी दुर्गा उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन बचत झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावी, असे भावनिक आवाहन भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
यवतमाळ जिल्ह्याला दुर्गा उत्सवाची समृद्ध परंपरा लाभली आहे. भव्य सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि विसर्जन मिरवणुकांमधील उत्साहपूर्ण सहभाग यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. मात्र, याच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे गंभीर वास्तवही समाजासमोर आहे. एका बाजूला उत्सवाचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाशी झुंजणारा शेतकरी, अशी परिस्थिती आहे.
दुर्गा उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी आहे. शेतकरी संपूर्ण देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अहोरात्र कष्ट करतो. मात्र, दुष्काळामुळे त्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ येते. अशा वेळी त्याला सहानुभूतीसोबत प्रत्यक्ष मदतीचीही गरज आहे.
त्यामुळे दुर्गा मंडळांनी मंडपाची अनावश्यक सजावट, अतिरिक्त विद्युत रोषणाई, महागडी ध्वनियंत्रणा, विसर्जन मिरवणुकीतील महागडी वाद्ये आणि इतर अवांतर खर्चात शक्य तितकी काटकसर करावी. उत्सवाचा धार्मिक उत्साह आणि परंपरा कायम राखत बचत झालेल्या रकमेतील काही हिस्सा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावा, असे आवाहन नितीन भुतडा यांनी केले आहे.
प्रत्येक मंडळाने आपल्या क्षमतेनुसार निधीस हातभार लावल्यास सामूहिक प्रयत्नांतून मोठी मदत उभी राहू शकते. ही मदत केवळ आर्थिक स्वरूपाची न राहता समाजातील एकता, संवेदनशीलता आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
उत्सवाच्या निमित्ताने देवीची आराधना करताना संकटग्रस्त आणि गरजू घटकांच्या वेदनांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबाला आधार मिळणार असेल, तर उत्सवाच्या खर्चात बचत करून मदत करणे हे मोठे सामाजिक पुण्य असल्याचेही भुतडा यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दानशूर नागरिक आणि सामाजिक संस्थांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा. शासनाच्या अधिकृत माध्यमांतून निधी जमा करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक तपशील निश्चित करून पारदर्शक पद्धतीने मदत करावी, असेही त्यांनी सूचित केले.
“जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा वाचला, तरच आपला समाज आणि अर्थव्यवस्था सक्षम राहील. यंदाच्या दुर्गा उत्सवात भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपूया. अनावश्यक खर्चाला फाटा देऊया आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलूया. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी माणुसकी आणि समाजाप्रती आपली जबाबदारी आहे,” असे आवाहन भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केले आहे.
