उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोईट (म.) शिवारातील विहिरीवरून मागील ५० वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र विद्युत समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित झाल्याने ग्रामस्थांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
सोईट (म.) शिवारातील विहिरीवरून ग्रामपंचायतीअंतर्गत मागील ५० वर्षांपासून ब्राह्मणगावला पाणीपुरवठा केला जातो. अतिरिक्त दाबामुळे वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे ब्राह्मणगावातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. त्यामुळे काही दिवसांपासून विहिरीवरील विद्युत कनेक्शन ढाणकी अंतर्गत जोडण्यात आले आहे. मात्र तेथील आठ-आठ तासांच्या भारनियमनाचा फटका बसल्याने ब्राह्मणगावचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.
यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थितीत गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, खासगी टँकरचे पाणी खरेदी करून तहान भागवावी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यातच ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
यंदा अत्यल्प पावसामुळे कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे आधीच त्रस्त असलेल्या गावकऱ्यांना सोईट (म.) शिवारातील विहिरीचे ढाणकी सबस्टेशन अंतर्गत जोडलेले कनेक्शन आणि त्यातून उद्भवलेल्या विद्युत समस्येचा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसांपासून गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, उन्हाच्या तीव्र उष्णतेत दैनंदिन गरजेपुरते पाणी विकत घेऊन गावकरी आपली तहान भागवत आहेत.
प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप असून, कासवगतीने हालचाली सुरू असल्याने गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत.
ब्राह्मणगावला पाणीपुरवठा करणाऱ्या सोईट (म.) शिवारातील विहिरीमध्ये दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे पुरवठा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. या विहिरीजवळून वाहणाऱ्या एसकेएफ गायपांदण नाल्यामध्ये मायनरद्वारे इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे गावाला पुरेल असा विहिरीत पाणीसाठा असायचा.
परंतु मागील वर्षी नाल्याचे खोलीकरण झाल्याने विहिरीजवळून पाणी वाहून जात आहे. त्यामुळे टंचाईच्या काळात ब्राह्मणगाव एसकेएफ गायपांदण नाल्याला इसापूर डाव्या कालव्याच्या मायनरचे पाणी सोडल्यास त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही. याबाबत ग्रामपंचायतीने पर्यायी उपाय शोधून गावकऱ्यांना उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी आहे.
ताहेर मिर्झा | एनटीव्ही न्यूज मराठी | उमरखेड
