प्रतिनिधी आयुब शेख
तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग येथे स्वर्गीय माधवराव अण्णा पुदाले यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकमान्य वाचनालय परिसरात पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाची प्रेरणादायी सुरुवात पत्रकार आयुब शेख यांनी केली. त्यांनी या शिबिरात १४ व्या वेळेस रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवत, “रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे” असा प्रभावी सामाजिक संदेश दिला.
या रक्तदान शिबिरात एकूण ६८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य केले. नळदुर्ग नगरीचे नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे, नगरसेवक दत्तात्रय दासकर, भाजप नेते सुशांत भूमकर, नगरसेवक शशिकांत पांडू पुदाले, नगरसेवक किशोर बनसोडे, भोई समाजाचे अध्यक्ष सुनील वोखंडे, भिमाजी घुगे, पप्पू पाटील यांच्यासह भोई समाजाचे अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.
या उपक्रमाचे आयोजन स्वर्गीय माधवराव पुदाले प्रतिष्ठान, भोईराज तरुण मंडळ आणि बाळकृष्ण युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आयोजक नगरसेवक शशिकांत पांडू माधवराव पुदाले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
“रक्तदान म्हणजेच जीवनदान” आणि “रक्तदान हा श्रेष्ठदान आहे” या संकल्पनेतून समाजसेवेचा वारसा अखंड ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वर्गीय माधवराव अण्णा पुदाले यांनी समाजसेवेचा जो दीप प्रज्वलित केला होता, तोच वारसा पुढील पिढीपर्यंत नेण्याचे कार्य या भव्य रक्तदान शिबिरातून स्पष्टपणे दिसून आले.
