- आ. कैलास पाटलांच्या सारोळा गावातच भाजपला मोठे मताधिक्य; पंचायत समित्यांवरही महायुतीचा कब्जा..!
धाराशिव प्रतिनिधी | दि. १० फेब्रुवारी २०२६
धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (महायुती) जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुसरीकडे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘उबाठा’ गटाला मतदारांनी सपशेल नाकारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निकालाचा सविस्तर आढावा घेतला असता, महायुतीने विजयाची मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५५ जागांपैकी महायुतीने तब्बल ३९ जागांवर घवघवीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. याउलट, उद्धव ठाकरे गटाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून त्यांच्या जागांची संख्या केवळ एक अंकी मर्यादित राहिली आहे. उर्वरित १६ जागांवर उबाठा गट आणि इतर उमेदवारांना समाधान मानावे लागले आहे.
या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘धक्कादायक’ निकाल आमदार कैलास पाटील यांच्या मतदारसंघात पाहायला मिळाला. आमदार कैलास पाटील यांचे स्वतःचे गाव असलेल्या सारोळा येथे चक्क भाजपच्या उमेदवाराला ८०० मतांचे भरघोस मताधिक्य मिळाले आहे. आपल्याच बालेकिल्ल्यात आणि स्वतःच्या गावात खिंडार पडल्यामुळे हा उबाठा गटासाठी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वासाठी सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
निवडणुकीच्या काळात जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे प्रचारात प्रत्यक्षपणे सक्रिय नव्हते. मात्र, त्यांनी पडद्यामागून आखलेली चपखल रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या फौजेने दिलेली झुंज पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. त्यांच्या ‘सायलेंट’ रणनीतीने जिल्ह्यात महायुतीचा झंझावात निर्माण केला आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी राणादादांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोहर उमटवली.
केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर जिल्ह्याचे हृदय मानल्या जाणाऱ्या धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही महत्त्वाच्या पंचायत समित्यांवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील राजकारणावर आता भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे. विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला जात असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी आयुब शेख, तुळजापूर, धाराशीव.
