खळबळजनक घटना
आरोपी पैकी एकास अटक तर दोघेजण फरार
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की काल गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील या घटनेतील आरोपींनी यांनी तुकाराम सुर्यभान काळे यांच्या घरी येऊन “कमल बाळू पिंपळे हिची मुलगी आमचा भाऊ ज्ञानेश्वर एकनाथ काळे याने पळवून नेली, हे तिच्या आईला का सांगितलं?” असा संताप व्यक्त करून शिवीगाळ केली व आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. मात्र हा वाद तिथेच मिटल्याने तक्रार देण्यात आली नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता बबन लोंढे याने घटनेतील फिर्यादी राहुल तुकाराम काळे यास कळविले की, “तुझ्या वडीलांना झोपडपट्टीत मारतायत!”. त्यानुसार राहुल व भाऊ दिगांबर हे घटनास्थळी गेले असता आरोपी सागर व वैभव चाकूने तर तुळसाबाई ही काठीने तुकाराम काळे यांना मारहाण करत होते आरोपींनी तुकाराम काळे यांच्या डोक्यात व खांद्यावर गंभीर मारहाण करून जखमी केल्याने ते बेशुद्ध झाले. यावेळी तुकाराम यांची मुलं राहुल व दिगांबर येताना पाहताच आरोपी गाडीतून फरार झाले. बेशुद्ध

अवस्थेत तुकाराम यांना खाजगी रूग्णवाहिकेतून जामखेड सरकारी रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानुसार फिर्यादी राहुल तुकाराम काळे (वय २५)
रा. फक्राबाद, ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर एकनाथ काळे, वैभव एकनाथ काळे व तुळसाबाई एकनाथ काळे सर्व रा. फक्राबाद, ता. जामखेड यांच्या विरूद्ध गुन्हा रजिस्टर क्र. ८१/२६ कलम १०३ (१), ३५२, ३५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वैभव एकनाथ काळे या आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124
