अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी येथे एका व्यक्तीच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या मुलांचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली असून, एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दिलीप करमदास भोसले, वय ४२ वर्षे, रा. वाकोडी शिवार, सोलापूर रोड, अहिल्यानगर यांना अज्ञात आरोपींनी मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल २६४४ बिभीषण काशिनाथ दिवटे यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ५४६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये आणि पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड व भगवान धुळे यांचे पथक तयार केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले.
तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास सुरू केला. या तपासादरम्यान, मृत दिलीप भोसले यांची मुले अंबर दिलीप भोसले आणि रोहित दिलीप भोसले, दोघेही रा. वाकोडी, ता. अहिल्यानगर, यांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
त्यानंतर पथकाने वाकोडी परिसरात शोध घेऊन अंबर दिलीप भोसले, वय १९ वर्षे, याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.
