नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावरील किल्ले कोलार परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पेट्रोल भरण्यासाठी जात असताना रविवारी दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, या महामार्गावरील धोकादायक वळण कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
नागपूर-सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) राष्ट्रीय महामार्गाच्या वळणावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार परिसरात २५ ऑक्टोबर, रविवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे खापरखेडा परिसरात शोककळा पसरली आहे.
रवींद्र मनोहर वलोकर, वय ५० वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक २, खापरखेडा, असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. रवींद्र वलोकर यांनी दोन वर्षांपूर्वी किल्ले कोलार टी-पॉईंट परिसरात केस कर्तनाचे दुकान सुरू केले होते.
रविवारी पत्नीला दुकानात सोडल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ते दुचाकी क्रमांक MH-40-CY-4895 ने नागपूर-सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर वळण घेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या MH-49-AT-9482 क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकने त्यांना फरफटत नेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
मृत रवींद्र वलोकर यांना लखव्याचा आजार होता. त्यामुळे त्यांच्याकडे ट्रायसायकल दुचाकी होती. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही रवींद्र वलोकर आणि त्यांची पत्नी स्वतःचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. खापरखेडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून, फरार ट्रकचालकाचा कसून शोध सुरू आहे.
रवींद्र वलोकर यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वळण ठरतंय डेथ पॉईंट!
नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावरील किल्ले कोलार परिसर खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या परिसरात येण्या-जाण्यासाठी महामार्गावर वळण देण्यात आले आहे. मात्र, हेच वळण आता अपघातांचे केंद्र ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या वळणावर वळण घेताना यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले असून, अनेकांना जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे हे धोकादायक वळण कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी केली जात आहे.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
