जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई केली आहे. उत्राण शिवारात २५ आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत चार वाहने आणि अंदाजे ६० ब्रास वाळूसह चार कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील उत्राण गावाच्या कर्दन शिवारात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर तहसीलदार गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली.
या कारवाईत दोन डंपर, दोन टाटा ट्रक अशी एकूण चार वाहने आणि अंदाजे ६० ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत चार कोटींहून अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या मोहिमेत उत्राण भागाचे मंडळ अधिकारी नदीम शेख, गालापूरचे ग्राम महसूल अधिकारी संदीप पाटील, रवीराज पाटील (उत्राण अ.ह.), नरेंद्र पाटील (उत्राण गु.ह.), वैभव पाठे (एरंडोल), सुदर्शन पवार (नांदखुर्द), सुधीर मोरे (आडगाव), कोतवाल प्रदीप पाटील व अमोल पाटील (आडगाव), तसेच पोलीस पाटील तिवारी दादा आणि राहुल महाजन यांनी सहभाग घेतला.
या संयुक्त कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अवैध वाळू उपशाविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
