जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरात उभारण्यात येत असलेल्या भव्य आणि आधुनिक नाट्यगृहाच्या नामकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या नाट्यगृहाला कोणते नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने मागणी केली असून, यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

एरंडोल शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या भव्य आणि आधुनिक नाट्यगृहाला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह’ असे नाव देण्यात यावे, अशी आग्रही आणि एकमुखी मागणी एरंडोल नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

स्थानिक आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहत असलेला हा सांस्कृतिक प्रकल्प शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारा ठरणार आहे. नगरपरिषदेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आणि परस्पर सहमतीने हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे.

या मागणीचे अधिकृत निवेदन आमदार ॲड. अमोल पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, महिला सबलीकरण आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे केंद्र असलेल्या या नाट्यगृहाला त्यांचे नाव दिल्यास भावी पिढीला त्यांच्या त्यागातून आणि कार्यातून सातत्याने प्रेरणा मिळेल, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली.

या लोकहिताच्या आणि वैचारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मागणीसाठी एरंडोल शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत पाठिंबा दर्शवला. निवेदन सादर करताना माजी नगरसेवक रुपेश महाजन, नगरसेवक अनिल महाजन, माजी नगरसेवक अतुल महाजन, नगरसेवक प्रशांत महाजन, रवींद्र महाजन, योगेश महाजन, नगरसेविका सुनीता महाजन आणि आरती महाजन यांच्यासह नगरपरिषदेचे इतर सर्व नगरसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या आधुनिक नाट्यगृहाच्या नामकरणाच्या मागणीचा प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, तसेच लवकरात लवकर अधिकृत ठराव मंजूर करून या वास्तूला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृह’ असे नाव घोषित करावे, अशी अपेक्षा एरंडोल शहरवासीयांसह सर्व नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *