युवा पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी विविध राज्यांतील पोलीस व संरक्षण दलाचे जवान सरसावले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि ३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या बाईक रॅलीचे पेणमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

युवा पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विविध राज्यांतील पोलीस जवान आणि संरक्षण दलातील जवान एकत्र आले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि ३१ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही राष्ट्रीय एकता बाईक रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात आहे.

कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही एकता रॅली गुजरातमधील केवडिया येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे संपन्न होणार आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली ही रॅली गोवा आणि कोकणमार्गे गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

या मोटारसायकल रॅलीचे पेण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल साई सहारा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. हॉटेल साई सहाराच्या वतीने सहभागी जवानांसाठी चहापान, भोजन आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक संस्था साई सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांनी जवानांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी युवा पिढीला मार्गदर्शन करताना कल्पेश ठाकूर म्हणाले की, तरुणांनी मोबाईलमध्ये गुरफटून न राहता मैदानी खेळ खेळावेत, व्यायामशाळेत जाऊन सुदृढ शरीर घडवावे आणि सर्व प्रकारच्या व्यसनांपासून स्वतः दूर राहावे. तसेच इतरांनाही व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या रॅलीमध्ये कर्नाटक राज्यातील पोलीस दलाचे १ अधिकारी आणि ११ जवान, गोवा राज्यातील २ अधिकारी आणि १२ जवान, केरळ राज्यातील १ अधिकारी आणि ११ जवान, लक्षद्वीपमधील १ अधिकारी आणि ८ जवान, तसेच एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ११ मधील २ अधिकारी आणि ४ जवान सहभागी झाले आहेत.

या रॅलीच्या ताफ्यात २१ मोटारसायकली, १ बस, १ ट्रक, १ ॲम्बुलन्स आणि ३ जीपचा समावेश आहे. याशिवाय रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह १ अधिकारी आणि २५ पोलीस अंमलदार सहभागी झाले आहेत. केरळ, कर्नाटक, गोवा आणि लक्षद्वीप पोलीस दलातील ५७ मोटारसायकलस्वारांचा या अभियानात सहभाग असल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पोलीस आणि संरक्षण दलातील जवानही या अभियानात सहभागी होत आहेत.

पेण येथे दाखल झाल्यानंतर पेण पोलीस ठाणे, दादर सागरी पोलीस ठाणे आणि हॉटेल साई सहाराचे मालक तसेच साई सहारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश ठाकूर यांच्या वतीने रॅलीतील सहभागी पोलिसांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी पेण पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश गर्जे, रायगड वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, गोपनीय शाखेचे किशोर घरत तसेच रायगड पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देणे, नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

पेणमधील स्वागत आणि सत्कारानंतर ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना झाली असून, पुढील प्रवासात गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *