फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या फळबाग लागवड सन २०२५ – २६ या चालू वर्षातील कुशल सामुग्री या बाबीच्या अनुदानाचा तिढा निर्माण झालेला असल्याचे उघड झालेल्या तालुक्यातील मोहरी ५, शिवनी रोड ६, पिंपळखूटा ८, बिटोडा भोयर ८, जांब हिसई ४, चोरद १९, सनगाव १, वनोजा ६, कवठळ ३, आसेगाव ३, मानोली ३, पिंप्री अवगण २, तऱ्हाळा २५, वरूड २, बोरव्हा २ अशा एकूण ९७ शेतकऱ्यांच्या बिलावर व मापन पुस्तिकेवर स्वाक्षऱ्याची खाडाखोड झाली असल्याने हे शेतकरी अडचणीत आलेले आहेत.
मार्च महिन्याचा शेवटचा एक दिवस उरला असताना आज अखेर या त्रांगडयाचा तिढा सुटण्याऐवजी वाढल्याची स्थिती आहे.काल सर्व देयके सहा.कृषी अधिकारी यांना परत करून तत्कालीन व सध्या निलंबित तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या घेवुन येण्याचे लेखी आदेश तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांनी निलंबीत असल्याने काम करता येणार नसल्याचे कारण देऊन स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिल्याची माहिती आहे.या परिस्थितीत वरील गावातील शेतकरी पुरता भरडल्या जाणार असल्याचे दिसते. या बिलावर खाडाखोड कुणी व का केली? याबाबत कृषी कार्यालयात उलट सुलट कुजबुज आहे.तत्कालीन तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या काळातील बिले काढायची नाहीत हा उद्देश ठेवून बिलावरील सह्याच्या जागी खाडाखोड करून सदर बिले ‘बिनकामाची’ केल्याचाही संशय नाव न सांगण्याच्या अटीवर काही कृषी कर्मचारी यांनी व्यक्त केला आहे. सहायक कृषी अधिकारी यांनी मापे नोंदविल्यानंतर त्याची शंभर टक्के तपासणी उप कृषी अधिकारी करतात व तशी स्वाक्षरी करतात,त्यावर मंडळ कृषी अधिकारी स्वाक्षरी करुन रक्कम अदायगीसाठी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे बिले व मापन पुस्तिका जातात तोपर्यंत ही खाडाखोड झालेली नव्हती.तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात ही खाडाखोड कुणी व का केली? हा प्रश्न खरा संशोधनाचा आहे. विद्दमान प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात झालेली खाडाखोड करण्याचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने यात संभ्रम निर्माण झालेला आहे.ह्या शेतकऱ्यांच्या रकमा त्यांना वेळेत न मिळाल्यास सहायक कृषी अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित होणार असल्याचे स्पष्ट संकेत तालुका कृषी अधिकारी यांनी दिल्याने ते पण प्रचंड धास्तावले असल्याची स्थिती आहे.

तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांनी माझ्या काळातील सह्या कोणी व का खोडल्या याची सखोल चौकशी होण्याची मागणी केली आहे तसेच नियमात खाडाखोड अक्षम्य असल्याचेही त्यांनी सांगितले. माझ्या खोट्या सह्या मारून देयके काढल्या जातील याचा धोकाही त्यांनी वर्तविला आहे. पदावर असलेल्या अधिकारी यांनी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असतांना शेतकऱ्यांना हे अनुदान न मिळाल्यास गोगरी, चोरद व येडशी या गावातील धगधगत्या विषयात ही गावे नव्याने समाविष्ट होऊन अनियमिततेची व्याप्ती वाढताना दिसत आहे. मार्च नंतर अनुदान न मिळाल्यास सर्वच गावातील लाभार्थी शेतकरी एकदम उद्रेक करतील यात शंका नाही.ही खाडाखोड कुणी व का केली, शेतकऱ्यांना हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यासाठी कोण जबाबदार आहे? याची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी जोर धरत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील हे फळबाग अनुदान अनियमितता प्रकरण दरदिवशी वाढत जात असतांना वरिष्ठ यात कुठलीच भूमिका घेत नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचे चित्र आहे.

निलंबित असल्याने प्रत्यक्ष कामापासून विभक्त आहे व शासन आदेशाखेरीज कुठलेही कामकाज मला करता येणार नाही.
– सचिन भास्कर कांबळे
तालुका कृषी अधिकारी मंगरूळपीर (सध्या निलंबित)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *