,जाफराबाद प्रतिनिधी दिनांक 6/4/2026 येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के होते तर प्रमुख वक्ते डॉ.पी.वाय.गडकरी उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते डॉ.पी.वाय गडकरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पुणे करार या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ.गडकरी म्हणाले की,1920 ला गांधीयुग सुरू झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व गांधीजींनी आपल्या हाती घेतले त्यांनी भारतामध्ये असहकार आंदोलन,सविनय कायदेभंगाचे आंदोलन इत्यादी आंदोलन करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला हे होत असताना भारतातील अस्पृश्य समाज मात्र आपल्या न्याय हक्कापासून वंचित होता त्याला वाचा फोडण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील दलित अस्पृश्य समाजाचे सामाजिक हक्क,मानवी हक्क त्यांना बहाल करण्यासाठी वेगवेगळे आंदोलने केली,वृत्तपत्रातून लिखाण केले तत्कालीन ब्रिटिश सरकार समोर त्यांनी हा विषय लावून धरला. त्याचे फलित म्हणजे 12 नोव्हेंबर 1930 ला पहिली गोलमेज परिषद, 7 सप्टेंबर 1931 ला दुसरी गोलमेज परिषद,17 नोव्हेंबर 1932 ला तिसरी गोलमेज परिषद या तीनही गोलमेज परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचे स्वतंत्र मतदार संघ व राखीव जागांची मागणी लावून धरली याचाच परिणाम असा झाला की, दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या रिपोर्टमध्ये अस्पृश्यांच्या हिताचे बरेच निर्णय घेण्यात आले ते सोडवण्यासाठी 16 ऑगस्ट 1932 ला इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा मांडला परंतु या जातीय निवाड्याला महात्मा गांधींनी कडाडून विरोध केला व पुणे येथील येरवडा जेलमध्ये 16 ऑगस्ट 1932 ला महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले या उपोषणामुळे दिवसेंदिवस महात्मा गांधींची तब्येत खालावत चालली त्यामुळे भारतातील अनेक तत्कालीन दिग्गज नेते यांनी बाबासाहेबांना विनंती केली की, आपण महात्मा गांधींचे उपोषण सोडविण्यासाठी व आपल्या मागण्यांमध्ये काही तडजोड करण्यासाठी पुढाकार घ्यावा तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचे प्रतिनिधी पंडित मनमोहन मालवीय यांच्यात 24 सप्टेंबर 1932 रोजी ऐतिहासिक पुणेकरार झाला या करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ ऐवजी 148 राखीव जागा देण्याचे ठरले.तसेच केंद्रीय विधिमंडळात 18 टक्के जागा राखीव म्हणून ठेवण्यात आल्या इ. तडजोडी करण्यात आल्याचे डॉ.गडकरी यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा विशिष्ट जातीसमूहासाठी नसून तो भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय,हक्क व स्वातंत्र्य मिळाले पाहिजे व त्यास मानव म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला लढा उभा केला म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट समाजासाठी लढा उभा न करता मानवतेसाठी लढणारे नेते होते असे सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ.मनोज पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.वझरकर यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिनिधी राहुल गवई जाफराबाद जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *