
(जाफराबाद, जालना)
जालना: सिद्धार्थ महाविद्यालयाच्या राजश्री सभागृहात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे यांचे व्याख्यान आयोजित करून पहिले पुष्प अर्पण करण्यात आले.यावेळ वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते डॉ.श्याम सर्जे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४० मध्ये ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकात फाळणीच्या मुद्द्यावर अत्यंत तटस्थ आणि अभ्यासपूर्ण भाष्य करणारे हे पहिले महत्त्वाचे पुस्तक असल्याचे सांगीतले. तसेच या पुस्तकातील काही मुद्द्यांची समीक्षा करताना जर मुस्लिमांना स्वतःचे वेगळे राष्ट्र हवे असेल आणि ते एकत्र राहू शकत नसतील, तर त्यांना बळजबरीने भारतात ठेवण्यापेक्षा वेगळे होऊ देणे देशाच्या सुरक्षिततेसाठी जास्त चांगले आहे, असे आंबेडकरांचे मत होते.अखंड भारतात जर मोठी मुस्लिम अल्पसंख्याक लोकसंख्या असंतोषात राहिली, तर भारतीय लष्कराच्या एकनिष्ठतेवर आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉ आंबेडकरानी व्यक्त केली होती.
तसेच डॉ.आंबेडकरांनी सुचवले होते की, जर फाळणी झाली तर शांतता राखण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येची पूर्णपणे अदलाबदल (Transfer of Population) करणे आवश्यक आहे.हे पुस्तक इतके प्रभावी होते की, १९४४ मध्ये महात्मा गांधी आणि मुहम्मद अली जिना यांच्यातील चर्चेदरम्यान या पुस्तकाचा संदर्भ घेण्यात आला होता असे ही डॉ. सर्जे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल भाऊ म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करण्याची गरज व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या सिद्धार्थ महाविद्यालयात दिनांक ०२एप्रिल ते १४एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापर्यंत विविध वक्त्यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देण्यात येणार असून महाविद्यालयांसह पारीसरातील आंबेडकर वादी नागरिकांनी व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो.डॉ.संतोष पहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद, जालना.
