• २७ एप्रिलपासून ११ मे २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात विशेष प्रतिबंधात्मक आदेश.
  • कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे पाऊल.
  • पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्र जमण्यावर आणि शस्त्र बाळगण्यावर बंदी.
  • धार्मिक कार्यक्रम, विवाह आणि अंत्यसंस्कारांना ठराविक नियमांसह सवलत.

NANDED | नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २७ एप्रिल सकाळी ६ वाजेपासून ते ११ मे २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून, अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या आदेशानुसार, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक परिसरात एकत्र जमण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी असेल. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे.

मात्र, हा आदेश कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाही. तसेच विवाह सोहळे, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रांसाठी सक्षम अधिकाऱ्यांनी विशेष परवानगी दिल्यास सवलत मिळू शकणार आहे. सभा, मिरवणुका, मोर्चे किंवा ध्वनीक्षेपक वाजवण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, शेख शादुल, नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *