NANDED| तालुक्यातील फुलवळ येथील २३ वर्षीय तरुण स्वप्नील प्रल्हाद बसवंते याला गाडी सोडवून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करत, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोघांविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे वृत्त असे की, दिनांक २४ मे २०२६ रोज रविवारी दुपारी आरोपी नवनाथ बनसोडे व हरिदास बसवंते यांनी संगणमत केले. त्यांनी मयत स्वप्निल प्रल्हाद बसवंते याच्या घरी जाऊन, “तुझी शाईन मोटरसायकल पोलीस ठाण्यातून सोडवून देण्यासाठी पैशांची गरज आहे,” अशी मागणी करत दबाव आणण्यास सुरुवात केली. “तुझा गुन्हा खूप मोठा आहे, त्यात तू सुटत नाहीस आणि तुला शिक्षा होणार,” असे म्हणत आरोपींनी स्वप्निलला सतत टॉर्चर केले.
याच मानसिक त्रासाला आणि दबावाला कंटाळून स्वप्नीलने रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून दबंगगिरी व खंडणी वसूल करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणी मयताची आई मीनाक्षी प्रल्हाद बसवंते (वय ३८ वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या आदेशान्वये नवनाथ भीमराव बनसोडे व हरिदास रामू बसवंते यांच्याविरुद्ध गुरनं. २००/२०२६ कलम १०८, ३०८(३), ३(५) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे करत आहेत.
कंधार प्रतिनिधी, एनटीव्ही न्यूज मराठी, कंधार.
