कंधार तालुक्यातील कंधारेवाडी येथे सततची नापिकी, पावसाचा खंड आणि कर्जाच्या विवंचनेतून ४५ वर्षीय शेतकरी दयानंद जनार्धन नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दयानंद नागरगोजे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सततची नापिकी आणि यंदा पिके वाढण्याच्या काळातच पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिके करपून जाऊ लागली होती. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत ते होते. गेल्या चार दिवसांपासून ते आत्महत्या करण्याबाबत इतरांना बोलून दाखवत होते.
८ सप्टेंबर रोजी रात्री जेवण करून ते गावातील दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ते घरी न आल्याने मुलगा कृष्णा नागरगोजे यांनी त्या घरी जाऊन पाहिले. दार आतून बंद असल्याने शिडी लावून आत पाहिले असता दयानंद नागरगोजे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी राहुल केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मेहुणे ईश्वर माधव कंधारे यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
