NANDED | भारताची जनगणना-२०२७ ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी येत्या १ ते १५ मे दरम्यान स्वतःहून आपली माहिती भरून ‘स्व-गणना’ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्हा नियोजन भवन येथे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्ह्यातील प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, एनएसएस आणि एनसीसीचे समुपदेशक उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटल जनगणनेचे महत्त्व अधोरेखित केले. स्व-गणनेची माहिती नागरिकांना se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १ ते १५ मे २०२६ या कालावधीत भरता येणार आहे.
नागरिकांनी नोंदणी केलेली संपूर्ण माहिती ही अत्यंत गोपनीय राहणार आहे. स्व-गणनेच्या प्रक्रियेत नांदेड जिल्हा राज्यात आणि देशात प्रथम क्रमांकावर येईल, अशा पद्धतीने सर्वांनी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या डिजिटल मोहिमेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शेख शादुल, कंधार (नांदेड)
