छत्रपती संभाजीनगर | गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
| दि. ११ जून
खरीप हंगामाच्या तोंडावर ऑनलाइन खत विक्री (Framework for Fertilizer Sale) प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने ही सक्ती तात्पुरती शिथिल करून ऑफलाइन खत विक्रीस परवानगी द्यावी, या मागणीसाठी आजाद समाज पार्टी (काशीराम) यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे आणि जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांनी ऑनलाइन खत विक्री प्रणालीतील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. वारंवार बंद पडणारा सर्व्हर, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव तसेच तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरणी व पिकांच्या वाढीवर होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनाद्वारे ऑनलाइन प्रणालीची सक्ती तात्पुरती शिथिल करून ऑफलाइन पद्धतीने खत विक्री करण्यास परवानगी द्यावी, सर्व्हरमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर कराव्यात, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्येवर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय वेळेवर खत उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
निवासी जिल्हाधिकारी विधाते साहेब यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनाकडे तातडीने पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
यावेळी अरविंद कांबळे (प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी), शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष), विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष), तातेराव ससाने (मराठवाडा कार्याध्यक्ष), काशिनाथ भाडेगावकर (मराठवाडा महासचिव), राहुल साबळे (जिल्हा प्रभारी), जावेद शेख (शहराध्यक्ष), अनामी मोरे (युवा जिल्हाध्यक्ष), साहेबराव दाभाडे (जिल्हा उपाध्यक्ष), नवाब पटेल (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पश्चिम), अमोल सोनवणे (शहर उपाध्यक्ष), अल्ताफ शेख (शहर उपाध्यक्ष) आणि भगवान ठोकळ (तालुका उपाध्यक्ष) उपस्थित होते.
