बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत गजानन बोरकर यांनी अमरावतीतील सातूर्णा परिसरातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
यशवंत सेनेचे कार्यकर्ते आणि तक्रारदार गजानन बोरकर हे सुमारे ५० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून बसले आहेत. त्यांच्याकडे दोरखंड असल्याचे सांगण्यात येत असून, ‘मला अडवलं तर गळफास घेऊन आत्महत्या करेन’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
सारंगपूर ग्रामपंचायतीशी संबंधित विविध अभिलेख आणि रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने सील करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी याबाबत योग्य कार्यवाही केली आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच गावकऱ्यांना मूलभूत पाणीपुरवठा व्यवस्थित उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
