आठवड्यात पाच दिवसांचे बँकिंग लागू करावे, PLI मधील भेदभाव थांबवावा आणि नवीन नोकरभरती राबवावी, अशा विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने आज देशभरात एकदिवसीय बँक संप पुकारण्यात आला आहे. या संपाला बुलढाणा जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील बँक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बुलढाण्यातील स्टेट बँक परिसरात कर्मचाऱ्यांनी काळे कपडे परिधान करून जोरदार आंदोलन केले. राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका तसेच काही खासगी बँकांमधील कर्मचारी आणि अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या मागण्यांसंदर्भात यापूर्वी प्रशासनाला निवेदन आणि संपाची नोटीस देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांना संपाचे पाऊल उचलावे लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. एकदिवसीय संपाच्या माध्यमातून बँकिंग सेवा आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न असल्याचेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या एकदिवसीय संपानंतरही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर महिन्याच्या अखेरीस तीन दिवसांचा संप करण्यात येणार आहे. त्यानंतरही तोडगा न निघाल्यास अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा इशारा बँक संघटनेने दिला आहे. देशभरातील जवळपास ९ लाख अधिकारी आणि कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *